Sunday, October 26, 2008

ती

जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!

म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!

तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली...

घडे क्षणांचे रिते असे केले की
देहसुखाचा प्याला भरून गेली

कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली!

तसे पाहता पाउस तितका नव्हता
कळे न का ती इतकी भिजून गेली...

तिच्या भोवती गंध अता दरवळतो
(सहवासचे अत्तर टिपून गेली!)