एका मोर्चाची गोष्ट
... मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या चळवळीपासून ते आजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्ण सहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली की गलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालंय असंही म्हणतात. असेलही. पुढारीपण हा धंदा झाल्यावर मोर्चे-घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्रं होणं साहाजिक आहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्या अग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णांचे लोक दिसत होते. बायका होत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसत नव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखांत होत्या. पण नर्सेस नव्हत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काही खेड्यांत पाहिला नाही. पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसत नव्हती. एका जिल्ह्माच्या गावाला पाह्मला होता. मी सायकलीवरुन उतरलो आणि विचारलं,
'कुणाचा मोर्चा आहे हो हा?'
'शाळामास्तरांचा- '
एक चमत्कारिक लज्जा, असहायता, संतापापेक्षाही कारुण्य, यापूवी- आम्ही असे कधीही हिंडलो नव्हतो...असा प्रासंग आमच्यावर येईल असं वाटलं नव्हतं असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तो मोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही. कुणी कुणाचा जयजयकार करीत नव्हतं. कुणी बोलत नव्हतं. मुठी वळत नव्हत्या. त्वेष नव्हता. आवेश नव्हता. आजवर आवरुन धरलेली एक अब्रू परिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यांतून सांडत चालली होती. माझ्या कानी शब्द आले... 'अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई' एक पेन्शनीला आलेली विधवा वृद्धादेखील पोटाला दोन वेळचं मिळत नाही हे यापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता सांगत निघाली होती. दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या. आपल्या दामलेबाई, पुढे कुठे बॅंड नाही- घरात नाही- तरीसुद्धा भर शाळेच्या वेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत हे त्या पोरींना कळत नव्हतं.
पण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेनं त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजर त्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचा गालगुच्चा घेतात त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी? पोरी बावरल्या. ह्मा दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत? आपल्या बरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या? दामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ असावे' चे कवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई, साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नको होता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हा पुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिक शिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्या मोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले. पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? शंभर उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाच होणार आहे? कोणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला. मीदेखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरुन मला ते थोडेसे हरी नारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेच होते. शुद्धलेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्यं एकेका शब्दावर जोर देऊन येत होती.
"शिक्षक बंधुभिगनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला. सरकारने कशाला म्हणू? सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपले दुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्या डोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो?' असं विचारणारं इतक्या वर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यात फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू? हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वी लग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्प सोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा." असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळयावर भयानक आघात करुन गेला. "आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आता आत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकच! व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती. उपाशी ठेवून गुरुजी वगैरे नका म्हणू. नवराबायको आणि दोनचार अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्या होतील एवढं द्या आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा आणि एज्युकेशन आक्टा ऐवजी फ्याक्टरी आक्ट लावा." काढलेला कोट खांद्यावर घेऊन मास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यानंतरच्या टाळया वाजवायला विसरली होती. कारण त्या सर्व स्त्रिपुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते. माझ्या मनात घर करुन राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकच भाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर!
(- 'पु. ल. एक साठवण')