आले आकंठ भरून
दिवेलावणीचे सल
पायातल्या सावल्यांची
नाही लागली चाहूल...१ ।।
थेंब थेंब वेचणारा
हात असावा हाताशी
जिवाभावाच्या भेटीची
जशी तहान तळाशी...२ ।।
एक डोळयातली वाट
एक अंगाच्या गावाची
क्रौंचवधाला किनार
वेधवंती विभ्रमाची...३ ।।
कोणी पाहण्याच्या आधी
वाटे झाकावेत डोळे
आपल्याच नजरेला
दिसे डोळयातले काळे...४ ।।
जागता हे अंगामध्ये
गाणे जुनेच नव्याने
माझ्या एकतारी पोटी
किती अव्यक्त तराणे...५ ।।
डॉ. सतिश कुलकर्णी (पिंपळगांवकर)